• Sun. Dec 14th, 2025

गोव्यात अग्नितांडवाचा भडका, ठाण्यात राजकारण तापलं!



गोव्यात अग्नितांडवाचा भडका, ठाण्यात राजकारण तापलं!

हिरानंदानी इस्टेट मधील बार अँड किचनला अधिकाऱ्यांचे संरक्षण

ठाणे – उत्तर गोव्यात गर्दीने भरलेल्या नाइटक्लबला शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे प्राथमिकरित्या केलेल्या चौकशीत समोर आले. ठाण्यातही विविध मॉल, वाणिज्य गृहसंकुल, मानपाडा येथील कोठारी कंपाउंड, हिरानंदानी इस्टेट, मेडोज, वागळे इस्टेट परिसरातील अवैद्य लाउंज आणि हुक्का पार्लरमध्ये तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, डान्सबार याठिकाणी अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी न घेता पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरु असतो. या आस्थापनांवर ठाण्यात कारवाईची मागणी मनसे आणि भाजपने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

उत्तर गोव्यात डान्स फ्लोअरवर नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. अनेक जण तळमजल्यावर आणि स्वयंपाकघरात अडकले होते. या ठिकाणी एका तात्पुरत्या बांधकामाने सहज पेट घेतल्याने आग पसरत गेली आणि काही वेळातच संपूर्ण क्लब आगीत जळून खाक झाला.

ठाण्यात महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांच्या संगनमतपूर्वक हेतूमुळे अशा आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. तसेच या परिसरात अवैधरित्या होणार्‍या तात्पुरत्या बांधकामाने गोवा अग्निकल्लोळ दुर्घटनेची पुनरावृत्ती निश्चितच होऊ शकते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक आहे”, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्त राव यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, हॉटेल, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावे. तसेच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी आयुक्त राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नववर्ष स्वागतादरम्यान होणाऱ्या पार्ट्यामध्ये असे अग्नितांडव घडण्याची शक्यता आहे. सर्तकता बाळगत तात्काळ या आस्थापनांवर कारवाई करावी. अन्यथा, मनसे स्टाईलने याठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल”, असा इशारा मनसेच्या जाधव यांनी दिला आहे. तर ठाणे शहरातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी शहरात हॉटेलला लागलेल्या आगीत काही ग्राहकांचा मृत्यू झाला होता. तर कापूरबावडी येथील वाणिज्य इमारत आगीत खाक झाली होती. वाढत्या अतिक्रमणांमुळे ठाणे शहरातील काही भागात अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकत नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप भाजपच्या पवार यांनी केला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें