आंदेकर टोळीवर अहिल्यानगर पोलिसांची कारवाई; पाच जण अटकेत, चार पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर : पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचे कारनामे तुरुंगाच्या भिंतीआडूनही सुरू असल्याचे समोर येत असतानाच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टोळीशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चार पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, कोयता आणि चाकूसह सुमारे २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आंदेकर टोळीतील वर्चस्वाच्या संघर्षातून मारहाण, हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे घडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. टोळीतील प्रमुख सदस्य तुरुंगात असतानाही त्यांचे जाळे पुणे आणि शेजारील जिल्ह्यांत सक्रिय असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य कारागृह प्रशासनाला पत्र पाठवून आंदेकर पिता-पुत्रासह टोळीतील प्रमुख गुन्हेगारांवर कारागृहात अधिक कडक निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अहिल्यानगर शहरातील मिरावली पहाड परिसराच्या पायथ्याशी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली. दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत मोठा गुन्हेगारी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर, समर्थ दूधभाते आणि आकाश पवार यांचा समावेश आहे. आरोपींकडून चार पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, एक कोयता आणि एक चाकू जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींपैकी समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते यांच्याविरोधात पुणे शहरात खुनाचा प्रयत्न, मकोका तसेच शस्त्र बाळगण्यासंदर्भातील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

