शिंदे गटाला धक्का? ठाकरे गटाच्या बैठकीला दोन बंडखोर खासदार हजर राहण्याची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा बंडखोर खासदारांपैकी दोन खासदार पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. संसदीय पक्षाने जारी केलेल्या व्हीपनुसार १८ जून रोजी होणाऱ्या बैठकीला धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या ठाकरे गटासोबत अनिल देसाई, विनायक राऊत आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बंडखोर खासदारांपैकी काहींनी लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आजच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, यावरून बंडखोरीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असून ठाकरे गटासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

