एसआयआरविरोधात ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाविरोधात (SIR) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त जनमोर्चाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभारावर दोन्ही नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. मनसे आणि शिवसेना (ठाकरे) यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात येणार असला, तरी त्यात अन्य राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चाची वेळ आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, SIR प्रक्रियेबाबत विरोधकांकडून निवडणूक आयोगावर विविध आरोप करण्यात येत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने SIRसंदर्भातील निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.

