सायन, विद्याविहारसह तीन पूल ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचे लक्ष्य; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी रखडलेल्या सायन रेल्वे पूल, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, तिन्ही पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुले करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी मुदती हुकल्याने नव्या डेडलाइनकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
तब्बल ११२ वर्षे जुना सायन रेल्वे पूल ऑगस्ट २०२४ पासून बंद असून, त्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. पूल १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. यापूर्वी मे आणि ऑगस्टच्या मुदतीही पूर्ण झाल्या नव्हत्या. पूल बंद असल्याने सायन परिसरासह दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.
विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे कामही अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचवेळी गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानचा १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असून, तोही १५ ऑक्टोबरपर्यंत खुला करण्याचे लक्ष्य आहे.
तीनही प्रकल्प पूर्ण झाल्यास पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यावेळी तरी प्रशासनाने निश्चित केलेल्या मुदतीत पूल प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुले होतात का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

