मंत्रिमंडळाचे सात मोठे निर्णय; साहसी पोलिसांना ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’, ५० हजारांचा पुरस्कार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस, वडार समाज, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित सात महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
पोलीस दलातील साहसी कामगिरीची दखल घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ सुरू करण्यात येणार असून, पदकासह प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रुपयांचा रोख पुरस्कार दिला जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल.
वडार समाजासाठी पारंपरिक दगडफोडी व गौण खनिज उत्खननाची वार्षिक मर्यादा २०० वरून ५०० ब्रास करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच उच्च व तंत्रशिक्षण संस्थांसाठी ‘सीएम सृष्टी’ संशोधन योजना, पोलीस कोठडीतील अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांत वारसांना आर्थिक सहाय्याचे धोरण आणि अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीस मंजुरी देण्यात आली.
याशिवाय अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेतील भत्त्यात वाढ तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

