उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने राज ठाकरे पोहोचले मातोश्रीला; वरळीतील मराठी विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी तब्बल १९ वर्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने मातोश्रीवर पाऊल ठेवले. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाणे हे आगामी राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. राज ठाकरे रविवारी सकाळी कोणालाही कल्पना नसताना अचानक आपल्या घरातून बाहेर पडले आणि मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले. राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांमध्ये मोजके प्रसंग वगळता मातोश्रीवर आले नव्हते. त्यामुळे रविवारी राज ठाकरे हे मातोश्रीवर येणे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे हे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत मातोश्रीवर आले. राज ठाकरे यांची गाडी मातोश्रीच्या गेटपाशी आली तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राज ठाकरे हे गाडीतून खाली उतरले तेव्हा मातोश्रीच्या गेटबाहेर त्यांना घेण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत स्वतः आले. यानंतर संजय राऊत हे राज ठाकरे यांना आतमध्ये घेऊन गेले. यावेळी त्यांच्या अवतीभोवती असंख्य कार्यकर्त्यांचा गराडा होता. एरवी उद्धव ठाकरे सहसा कोणीही मातोश्रीवर आल्यावर गेटपर्यंत त्यांना घेण्यासाठी जात नाहीत. मात्र,रविवारी राज ठाकरे आले तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या गेटवरच उभे होते. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसून आले आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला. मातोश्रीवर उभारण्यात आलेल्या स्टेजवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उभे राहून कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि त्यानंतर हे दोघे आतमध्ये निघून गेले. आता मातोश्रीच्या वास्तूत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, राज ठाकरे हे अवघ्या १५ ते २० मिनिटांत मातोश्रीवरुन बाहेर आले आणि पुन्हा आपल्या घरी निघून गेले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.