चेंबूरमध्ये ‘भीमाची लेक’ रणांगणात; वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी चर्चेत
रवि निषाद / मुंबई
मुंबई – आगामी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५० मध्ये वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रणशिंग फुंकले असून, ‘भीमाची लेक’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या श्रीमती तनवी किरण साळवे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मैदानात उतरण्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
२५ नोव्हेंबर रोजी दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर झालेल्या ‘संविधान सन्मान महासभे’त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले होते. या महासभेनंतर ‘भीमाची लेक’ अशी ओळख मिळालेल्या तनवी साळवे यांचे नाव राजकीय वर्तुळात विशेष चर्चेत आले. त्यानंतर प्रभाग १५० मधील अनेक मतदारांनी ‘आपली नगरसेविका तनवी साळवेच’ अशी अपेक्षा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १५ जानेवारीला बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होणार असून, त्यासाठी सर्वत्र निवडणूक हालचालींना वेग आला आहे. चेंबूरमधील प्रभाग १५० मध्ये आंबेडकरी समाजाची लक्षणीय संख्या असल्याने वंचित बहुजन आघाडीने येथे विशेष तयारी सुरू केली आहे. उमेदवारीची तयारी करणाऱ्या तनवी किरण साळवे यांनी या प्रभागात व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली आहे.
पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील नागवाडी, कादरिया नगर, माळेकर वाडी, गुलशन बाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नुरानी बाग, पंजाबी चाळ, फुले नगर आदी भागांत पोस्टर्स, बॅनर्स व कटआउट्स लावून प्रचाराला गती देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात तनवी साळवे यांच्याबाबत उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लेक” अशी ओळख असलेल्या तनवी साळवे यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ‘लढायचे आणि जिंकायचे’ या निर्धाराने त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. याच निर्धारातून प्रभागातील कार्यकर्ते आणि समर्थकही जोमाने कामाला लागल्याचे चित्र सध्या चेंबूरमध्ये दिसत आहे.

