राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय; नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा आणि धाराशिव शहरात अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला मंजूरी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, जनतेला थेट लाभ मिळेल अशा कुठल्याही घोषणा करण्यावर किंवा निर्णय घेण्यावर निर्बंध आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली.बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, एक एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील झालेल्या निर्णयात
१) सामान्य प्रशासन विभाग – ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार.
२) ग्रामविकास व पंचायत राज विभाग – राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार.
३) महसूल विभाग – धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा.
४) नगर विकास विभाग – महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार.

