अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधवांच्या घरी आक्रोश; ठाण्यातील विटाव्यावर शोककळा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार (पर्सनल सेक्युरिटी ऑफीसर, पीएसओ) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे.
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. याच दौऱ्यामध्ये मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही त्यांच्यासमवेत पीएसओ म्हणून डयूटी होती.
सकाळी ८.१० चे विमानाचे मुंबईतून टेक ऑफ असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५.३० वाजता पोहचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथील त्यांच्या सासूरवाडीमध्ये गेले होते. तिथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता डयूटीसाठी रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचेच वृत्त माध्यमांमध्ये झळकल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
या विमानात अजित पवार, विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) हे प्रवास करत होते. जाधव हे विटावा येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीच्या बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरड गावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. खारघर येथून त्यांची पत्नी, मुलगी तसेच विटाव्यातून आई आणि मुलगा असे संपूर्ण कुटूंबीय हे बारामतीकडे रवाना झाले.
बारामतीपासून जवळच असलेल्या फलटण तालुक्यातील तरड गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.एकीकडे विदीप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएसओ म्हणून तर मुंबईच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतून लिपीक म्हणून निवृत्त झालेले त्यांचे वडिल दिलीप हेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ओळखले जातात. त्यांची पत्नी संध्या ही कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहे.

