१ ऑगस्टपासून एसटी प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड सक्तीचे; महिला व ज्येष्ठ नागरिकांनी तत्काळ नोंदणी करावी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
राज्यात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्ड वितरणासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक केंद्रे कार्यरत असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्मार्ट कार्ड वितरणात गैरव्यवहार करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
प्रवासी सवलतींचा लाभ पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा तसेच एसटीची तिकीट व्यवस्था अधिक आधुनिक व्हावी, या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

