दादरमधील २७ अतिक्रमणे हटली; कुर्ला-सीएसएमटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाला गती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मध्य रेल्वेवरील बहुप्रतिक्षित कुर्ला-सीएसएमटी पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका उभारणी प्रकल्पाला गती देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दादर (पूर्व) परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील २७ कायमस्वरूपी अतिक्रमणे हटवली आहेत. या कारवाईमुळे प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला असून पुढील कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दादरमधील कारवाईपूर्वी वांद्रे परिसरातही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर उभारलेल्या बांधकामांमुळे अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या कामात अडथळे निर्माण होत होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोहिमेत एकूण ५३ सुरक्षा कर्मचारी सहभागी होते. त्यामध्ये १४ आरपीएफ जवान, २६ जीआरपी जवान आणि १३ मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कारवाई शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण करण्यात आली.
कुर्ला-सीएसएमटी पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत. परिणामी रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होऊन गाड्यांची वेळपालनक्षमता सुधारण्यास मदत होईल. तसेच मध्य रेल्वेवरील वाढती प्रवासी गर्दी आणि वारंवार होणारे विलंब कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या संपूर्ण पट्ट्यात टप्प्याटप्प्याने भूसंपादन, मंजुरी आणि अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी अशा स्वरूपाच्या मोहिमा पुढील काळातही राबविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेला अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

