• Sat. Aug 8th, 2026

महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू



महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा तसेच शेअर बाजार उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून, १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर पोलिसांकडून ई-मेलचा स्रोत आणि प्रेषकाचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीच्या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा करण्यात आल्या असून काही व्यक्तींची नावेही नमूद करण्यात आली आहेत. तसेच, नागरिकांनी मुलांना शाळेत पाठवू नये आणि मेट्रोने प्रवास टाळावा, असा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीही महापौर रितू तावडे यांना दोन वेळा अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते.

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सायबर पोलिसांकडून ई-मेलचा आयपी अॅड्रेस, त्याचा स्रोत आणि तो पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास केला जात आहे. तसेच, संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दरम्यान, रितू तावडे या अलीकडे महापौर बंगल्याशी संबंधित निविदेच्या वादामुळे चर्चेत होत्या. महापौर बंगल्याच्या कामासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा काढल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी संबंधित निविदा मागे घेण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी त्यांनी हे काम प्रत्यक्षात राणीच्या बागेतील प्रकल्पाशी संबंधित असून महापौर बंगल्याचा उल्लेख चुकून झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच, महापौर बंगल्याबाबत चुकीचे कथानक पसरविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

या धमकीच्या ई-मेलचा आणि अलीकडील वादाचा कोणताही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें