‘बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला’; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “बिल्डरांच्या नादी लागून काही लोकांनी महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला,” असा आरोप नाईक यांनी सानपाडा येथील कार्यक्रमात केला. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
कॉलनी भागातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचा वापर करणे शहराच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत नाईक यांनी बिल्डरांच्या हितासाठी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला. “जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्याचा तमाशा जनतेसमोर दाखवू,” असा इशाराही त्यांनी दिला.
नाईक यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही शिंदेंवर टीका केली. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाईक यांना महायुतीतील मतभेद सार्वजनिक न करण्याचा सल्ला दिला. “आपण महायुतीत एकत्र काम करत आहोत. मनातील खदखद वरिष्ठांकडे मांडावी,” असे कदम यांनी म्हटले.
नाईक यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा तोंड फुटले आहे.

