‘मी बाळूदादाला मारलं नाही’; पप्या शिंदेच्या आईचा दावा, ‘खरा सूत्रधार टल्ली’
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : मानपाड्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित पप्या शिंदे याच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पप्या शिंदेच्या आईने त्याच्यावरील आरोप फेटाळून ‘हत्येच्या कटाची माहिती त्याला नव्हती’, असा दावा केला आहे.
पप्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात भेट झाली असता पप्या ढसाढसा रडत होता. “माझ्या डोळ्यादेखत बाळूदादाला गोळ्या घातल्या, त्यामुळे तो रडत आहे. पप्याचा हत्येत सहभाग असल्याचे आरोप खोटे आहेत,” असे तिने म्हटले.
पप्या हल्लेखोरांच्या वाहनातून आला होता, हे मान्य असल्याचे सांगतानाच त्याला हल्ल्याची पूर्वकल्पना नव्हती, असा दावा आईने केला. तिच्या म्हणण्यानुसार, ‘टल्ली’ नावाचा व्यक्ती पप्याच्या संपर्कात होता आणि त्याच व्यक्तीने हा कट रचल्याचे पप्या सांगत आहे. संबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतर सत्य समोर येईल, असेही तिने म्हटले.
दरम्यान, पोलिस तपासात पप्या शिंदेच्या भूमिकेबाबत महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आईने केलेल्या दाव्याचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. या प्रकरणातील कथित सूत्रधार कोण, याचा तपास सुरू आहे.

