रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे ‘अल्टिमेटम’; १८ ऑगस्टपासून कारवाई होणार – प्रताप सरनाईक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी किमान संवाद साधता यावा, यासाठी मराठी भाषा शिकण्याची दिलेली मुदत आता संपत आली आहे. १५ ऑगस्टनंतर मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मराठी शिकण्यासाठी यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमराठी भाषक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा कार्यशाळा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत रिक्षा चालक, ओला तसेच अन्य प्रवासी वाहतूक सेवांमधील चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र दिनापासून १५ ऑगस्टपर्यंत १०५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
“महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे. राज्य शासनाने चालकांना मराठी शिकविण्याची जबाबदारी घेतली आहे. मराठी शिकण्यासाठी यापूर्वीही बराच कालावधी देण्यात आला असून, आता १०५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे,” असे सरनाईक यांनी ठाण्यात सांगितले.
दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षा चालकांना कोकण मराठी साहित्य संघाकडून मराठी भाषा येत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
*आरटीओकडून कारवाई*
मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई कोण करणार, याबाबतही सरनाईक यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून, परिवहन कायद्यातील तरतुदींनुसारच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
“कारवाई कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाईल. मराठी शिकण्यासाठी यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

