‘पूर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग’; आरोपांवर मिनाक्षी शिंदेंचे प्रत्युत्तर
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : मानपाडा येथे ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची दोन दिवसांपूर्वी गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांच्यावर ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. “माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना आरोप केले जात आहेत,” असा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला.
दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावांचा एफआयआरमध्ये उल्लेख असल्याचा दावा केला. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या सहभागाचा आरोप केला जात असताना त्यांच्यावर कारवाई किंवा अटकेची मागणी का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, हत्येमागील कारणे आणि सूत्रधार याबाबत तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

