शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी ३० ऑक्टोबरची मुदत; निकालाकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची बाजू; त्यानंतर ठाकरे गटाचा प्रतिवाद अपेक्षित
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह यावरून वाद सुरू झाला. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
न्यायालयात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची बाजू मांडली जाणार असून, त्यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिवाद दाखल केला जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याचे नियोजन म्हणजे त्याच दिवशी अंतिम निकाल लागेल, असे निश्चित नाही. त्यामुळे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे.

