केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग; १२ रिक्त जागांवर नव्या चेहऱ्यांची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९च्या लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित लक्षात घेऊन मंत्रिमंडळात युवा, महिला तसेच मित्रपक्षांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संविधानाच्या अनुच्छेद ७५(१अ)नुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही. सध्या काही मंत्री एकापेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार सांभाळत असल्याने आगामी फेरबदलात खात्यांचे पुनर्वाटप होण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, काही मंत्र्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांचा विचार होऊ शकतो. पंजाबमध्ये भाजप-अकाली दल युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचीही चर्चा आहे.
महाराष्ट्रात शिंदेसेनेचे लोकसभेतील संख्याबळ वाढल्याने या पक्षाला केंद्रात आणखी प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच इतर मित्रपक्षांनाही विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून सर्वांचे लक्ष भाजपच्या नेतृत्वाकडे लागले आहे.

