नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या; दाऊदच्या मालमत्तांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष एमपी – एमएलए न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात मलिक यांच्यासह इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून, या प्रकरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दैनंदिन सुनावणीला सुरुवात होणार आहे.
ईडीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, १९९३ च्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर यांच्या मालकीची तीन एकर जमीन कट रचून बळकावली, असा आरोप आहे. या व्यवहारातून मिळालेला निधी “proceeds of crime” म्हणून वापरला गेल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
मलिक यांना या प्रकरणात २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असून ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणातील सुनावणीसाठी मंगळवारी दुपारी ३ वाजता विशेष न्यायालयात हजेरी लावण्यात आली. या वेळी मलिक यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा उल्लेख करत, ईडीकडून मागितलेल्या कागदपत्रे मिळेपर्यंत आरोप निश्चित प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती केली.
तथापि, विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकरणात चार आठवड्यांच्या आत आरोप निश्चित करणे आवश्यक आहे. न्यायालयाने एएसजीद्वारे उच्च न्यायालयात दिलेल्या निवेदनावर नाराजी व्यक्त केली आणि “खंडपीठाच्या वतीने कोणीही आधीच कोणतेही विधान करू शकत नाही,” अशी टिप्पणी नोंदवली. न्यायालयाने पुरावे आणि दस्तऐवजांचा अभ्यास करून, मलिक आणि इतर आरोपींविरुद्धच्या आरोपांना प्राथमिकदृष्ट्या आधार आहे, असे नमूद केले. त्यामुळे या प्रकरणात नियमित सुनावणीला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून, मनी लाँड्रिंग प्रकरणाचा न्यायालयीन लढा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करीत आहे.

