काँग्रेसमध्ये प्रमोद (आप्पा) पाटील यांचा प्रवेश; नेहरू नगरला कर्तव्यदक्ष नेतृत्व मिळणार
रवि निषाद / मुंबई
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे मुंबई प्रवक्ते तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. प्रमोद (आप्पा) पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश राज्यसभा खासदार श्री. इमरानजी प्रतापगडी यांच्या उपस्थितीत तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व लोकप्रिय खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
श्री. प्रमोद (आप्पा) पाटील यांचे वडील आणि आजोबा हे स्वातंत्र्यसैनिक असून स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. देशहिताची मूल्ये त्यांना घरातूनच मिळाल्याने सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड, प्रभावी वक्तृत्व आणि शब्दाला असलेले वजन यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न, नागरी समस्या यांचे निराकरण ते तात्काळ करत असल्याने ‘आप्पा’ या आदरार्थी नावाने ते परिसरात परिचित आहेत. त्यांनी २००९ व २०१४ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पक्षाला निश्चितच बळ मिळेल आणि प्रभाग क्रमांक १६९, नेहरू नगर मतदारसंघातून श्री. प्रमोद (आप्पा) पाटील हे जनतेच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास काँग्रेस पक्षातील मान्यवर तसेच युवा नेते श्री. श्रीनिवास नायडू यांनी व्यक्त केला आहे.

