एकनाथ शिंदेंसोबत युती तर अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका कारभाऱ्यांविना आहेत. त्यामुळे प्रशासक राज असल्याने नागरिकांची सुद्धा मोठी कुचंबणा झाली. मात्र, आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. १५ जानेवारी रोजी मुदत संपलेल्या २७ महानगरपालिका आणि दोन नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी मतदान होणार आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता आजपासून निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. आचारसंहिता सुद्धा महानगरपालिका क्षेत्रात आजपासूनच लागू झाली आहे.
राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला झाली असली, तरी महापालिका निवडणुकीवर स्थानिक पातळीवर लढती होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे याबाबत सुतोवाच केले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थेट भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात सामना होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या ठिकाणी जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्यास विरोधकांचा फायदा होईल, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये तसेच अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा त्यांना काँग्रेसने साथ दिली तरीही महायुतीला मुंबईकर साथ देतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवेल असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले होते. दोन्हीकडून जहरी टीका सुद्धा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

