प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला वाद विकोपाला; भाजपच्या ५० नगरसेवकांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा भाईंदर – शिवसेनेचे नेते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातला वाद विकोपाला गेला असून मिरा भाईंदरचे भाजपचे सुमारे ५० हून अधिक नगरसेवक शिवसेनेविरोधात पोलीस स्टेशनसमोर बसले. आमदार नरेंद्र मेहता यांना शिवीगाळ करणाऱ्या, धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी नगरसेवकांची मागणी होती. भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सरनाईक यांना माझ्या गाडीवर ड्रायव्हर ठेवले असते, अशा आशयाचे विधान नरेंद्र मेहता यांनी केल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नरेंद्र मेहता यांच्याविरोधात शिवसैनिक रोष व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहता आणि भाजपच्या मिरा भाईंदरमधील ५० नगरसेवकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडून शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार मेहता यांना धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महापालिका निवडणूक हरल्यापासून प्रताप सरनाईक फ्रस्टेड झाले आहेत . त्या निवडणुकीमध्ये मला कधी म्हणाले ट्राफिक वॉर्डन बनवतो, कधी म्हणाले हवालदार बनवणार, कधी म्हणाले मदारी करणार.. पण ज्यावेळी आम्ही त्याला ड्रायव्हर ठेवणार असे बोललो तर त्यांना आता मिरची लागली आहे, असा पलटवार नरेंद्र मेहता यांनी केला.
सरनाईक यांनी माझे पर्सनल फोटो टाकायला सुरुवात केली आहे. पूर्वेश आणि त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप आहे. माझे वैयक्तिक फोटो टाकणे पूर्वेशला शोभते का? त्यांच्या मनात काय राग आहे मला माहित नाही, कदाचित त्यांचा त्यांच्या घरावर संशय आहे हे मला माहित नाही, असे मेहता म्हणाले.
सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत, आम्ही सगळे पोलीस स्टेशनला आलो आहोत. आता सरनाईक आणि पूर्वेशला मला एकच सांगायचे आहे की हमने तो अपना सबकुछ गवा दिया है, आम्ही जर तुमच्या मागे लागलो तर तुला आणि तु्झ्या वडिलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मर्यादा काय असते ते आम्हाला माहित आहे. सरनाईक सारखा खोटारडा माणूस जगात नसेल. ते स्वतः भ्रष्टाचारी आहेत, ज्यांनी आमच्या विरोधात मर्यादा ओलांडून काही पोस्ट केल्या, त्यांच्या विरोधात आम्ही नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पूर्वेश सरनाईक आणि प्रताप सरनाईक हे यामागचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

