• Fri. Jun 5th, 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंजाबमध्ये आप ची एकतर्फी बाजी; भाजप भुईसपाट तर काँग्रेस चमकली



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंजाबमध्ये आप ची एकतर्फी बाजी; भाजप भुईसपाट तर काँग्रेस चमकली

योगेश पांडे / वार्ताहर

पंजाब – शेतकरी आंदोलनानंतर पंजाबमध्ये अडचणीत आलेल्या भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिरोमणी अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर राज्यात स्वतंत्रपणे पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत अत्यंत मर्यादित यश मिळाले. संपूर्ण राज्यात भाजपाला केवळ ५२ जागांवर विजय मिळवता आला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. प्रभागांनुसार आम आदमी पक्षाला तब्बल ६३० जागा मिळाल्या. काँग्रेसने २१५ जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. तर शिरोमणी अकाली दलाने १७५ जागांवर विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले. अपक्ष आणि इतर उमेदवारांनीही २१४ जागांवर विजय मिळवला.

आम आदमी पक्षाच्या ७ राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबमध्ये ‘आप’ला फटका बसेल, अशी चर्चा होती. मात्र महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांत ‘आप’ने मोठे यश मिळवत विरोधकांना धक्का दिला. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील कामांवर जनतेने विश्वास दाखवल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले असून २०२७ विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षाने आपली ताकद सिद्ध केली आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर भाजप आणि अकाली दलाची दीर्घकालीन युतीही तुटली. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भाजपाची संघटनात्मक ताकद कमी झाल्याचे या निकालांतून स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्येही पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याचे मानले जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें