बसस्थानकांवरील चोऱ्यांचा पर्दाफाश; पुण्यातील महिलेला अटक, २.८९ लाखांचे दागिने जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील विविध शहरांतील बसस्थानक परिसरात महिलांच्या पर्स आणि दागिने चोरी करणाऱ्या पुण्यातील एका महिलेला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे २ लाख ८९ हजार रुपये किमतीचे चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सविता अवताडे असे असून ती पुणे येथील रहिवासी आहे. प्राथमिक तपासात अक्कलकोट, इस्लामपूर, कोल्हापूरमधील जुना राजवाडा परिसर, सांगली आणि सोलापूर येथील बसस्थानकांवर घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवताडे या घरातून गावाकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडत असत. त्यानंतर त्या विविध शहरांमधील गर्दीच्या बसस्थानकांवर जाऊन महिला प्रवाशांना लक्ष्य करत. महिलांच्या पिशव्या, पर्स आणि दागिने चोरण्याच्या घटनांमुळे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
प्राप्त तक्रारी, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी संशयित महिलेचा शोध घेत तिला अटक केली. चौकशीदरम्यान तिच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख ८९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आणखी काही गुन्ह्यांशी तिचा संबंध आहे का, तसेच इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, संबंधित महिलेची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याची आणि तिची मुले उच्चशिक्षित असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे अनुकूल कौटुंबिक व आर्थिक पार्श्वभूमी असतानाही तिने चोरीचा मार्ग का स्वीकारला, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणामागील नेमकी कारणे आणि संभाव्य हेतू यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

