• Fri. Jul 24th, 2026

‘ऑपरेशन टायगर’मध्ये नवा ट्विस्ट; ओमराजे निंबाळकर सोमवारी ‘मातोश्री’वर भूमिका स्पष्ट करणार?



‘ऑपरेशन टायगर’मध्ये नवा ट्विस्ट; ओमराजे निंबाळकर सोमवारी ‘मातोश्री’वर भूमिका स्पष्ट करणार?

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना रविवारी नवे वळण मिळाले. शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करत आपली भूमिका सोमवारी जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधल्याची आणि ‘मातोश्री’वर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांनी रविवारी मध्यरात्री पुण्यात जाऊन ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी निंबाळकर यांनी पक्ष नेतृत्वासमोर आपली भूमिका थेट मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे समजते. यावेळी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून पक्षासोबतच आहोत, असे निंबाळकर यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “आज मी खासदार आहे, ते पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठबळामुळेच. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ओमराजे निंबाळकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणात अपेक्षित निकाल न लागल्याने ते अस्वस्थ होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी पक्षातील काही नेत्यांकडून झालेल्या टीकेमुळेही नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.

विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ओमराजे नाराज असल्याची चर्चा आहे. एकीकडे त्यांची मनधरणी सुरू असताना दुसरीकडे सार्वजनिक पातळीवर टीका होत असल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या सर्व घडामोडींमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी वेग आला असून, ओमराजे निंबाळकर सोमवारी नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें