रोहित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; अंगावर जखमांच्या खुणा
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती : शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतरे यांची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आईसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिचा मृतदेह राहत्या घरासमोरील इमारतीच्या कंपाउंडबाहेर सुमारे १० ते १५ फूट अंतरावर आढळून आला. इमारतीच्या टेरेसचा दरवाजा बंद असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे हा अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
मुलीच्या अंगावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आमदार रोहित पवार यांनीही शासकीय रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेत पोलिसांशी चर्चा केली. बारामती पोलीस सर्व शक्यतांचा तपास करीत आहेत.

