उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना-भाजप वाद न्यायालयात; १५ दिवसांत स्वीकृत नगरसेवकाची निवडणूक घेण्याचे आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीला महापौर आणि आयुक्तांनी दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत १५ दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी ११ सप्टेंबर रोजी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या महापौरांनी आयुक्तांना पत्र देऊन सभा स्थगित करण्याची मागणी केली. त्यानुसार महासभा स्थगित करण्यात आली. या निर्णयाविरोधात भाजपने प्रथम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापौर आणि आयुक्तांचा स्थगिती आदेश फेटाळून १५ दिवसांत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
दरम्यान, दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडे ३४, तर भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याचे सांगण्यात येते. संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

