विशाखा राऊत यांच्या जागेबाबत सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश; सध्या कोणाचीही नियुक्ती नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला आहे. राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सध्या कोणाचीही नियुक्ती करू नये, असे निर्देश दिले आहेत.
राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित पक्षांना नोटीस बजावली असून, राऊत यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया सरवणकर यांनाही आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राऊत यांच्या नगरसेवकपदाची वैधता अंतिमतः बहाल झालेली नसून, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा सध्या जागा रिक्त ठेवण्यापुरता अंतरिम दिलासा आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

