सामूहिक अत्याचार प्रकरणी नरेंद्र पवारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भिवंडी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
पडघा पोलीस ठाण्यात पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात एका २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. पीडितेने शस्त्राचा धाक दाखवून आणि मद्य पाजून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपांनंतर नरेंद्र पवार यांनी भाजपमधील आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. पवार यांनी यापूर्वी आरोप फेटाळून हे प्रकरण कट असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयीन निर्णयानंतर आता पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

