• Sun. Oct 19th, 2025

जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या मराठी अधिकाऱ्याच्या बदलीचे तीव्र पडसाद, कर्मचारी संघटना आक्रमक, आयुक्तांना निर्वाणीचा इशारा



जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या मराठी अधिकाऱ्याच्या बदलीचे तीव्र पडसाद, कर्मचारी संघटना आक्रमक, आयुक्तांना निर्वाणीचा इशारा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई उपनगरातील विलेपार्ले परिसरात जैन मंदिरावर झालेल्या कारवाईवरुन प्रचंड गदारोळ माजला आहे. या मंदिरावर न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली असली तरी जैन समाजाच्या मोर्चानंतर रोष कमी करण्यासाठी के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी हा आदेश दिला होता. यावरुन आता मुंबई म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. या संघटनेने नवनाथ घाडगे यांच्यावरील कारवाईचा विरोध करत राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. विलेपार्ले येथील जैन मंदिरावरील कारवाई ही न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आली होती. मग वॉर्ड ऑफिस आणि अभियंते दोषी कसे ठरतात, असा सवाल मुंबई म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशनने उपस्थित केला. यापुढे संवेदनशील ठिकाणी कारवाई करताना मुंबई महापालिका आयुक्त कारवाईच्या ठिकाणी हजर असतील तरच कारवाई केली जाणार, असा निर्णय इंजिनियर्स असोसिएशनने घेतला आहे. राजकीय दबावापोटी इंजिनियर्स आणि वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचा आरोपही संघटनेने केला. वॉर्ड ऑफिसरच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तसेच मंत्री मंगल प्रभात लोढा यांना जैन मंदिरावर कारवाई होणार हे माहीत असताना त्यांनी कारवाई आयुक्तांची चर्चा करून का थांबवली नाही ? असा सवालही म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी उपस्थित केला.

संबंधित जैन मंदिर पाडकामासाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल नऊवेळा नोटीस बजावली होती. नोव्हेंबर २०२० पासून या मंदिरावर कारवाई प्रस्तावित होती. विविध न्यायालयांचे निकालही पालिकेच्या बाजूने लागले होते. तसेच हे जैन मंदिर ९० वर्षे जुने असल्याचे खोटे सांगण्यात आले आहे. या जागेवर आधी एका बंगाली कुटुंबाचे घर होते. १९७६ मध्ये इमारतीचे बांधकाम झाल्यावर विकासकाने हे बांधकाम हटवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता या जागेत आधी कार्यालय मग मंदिर बांधण्यात आले, असे नेमिनाथ सोसायटीचे सदस्य नरेंद्र कनाकिया यांनी म्हटले. विलेपार्ले येथील जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर पाडकाम कारवाई करु नये, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महानगरपालिकेला दिले. ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात दोन अपील दाखल केली आहेत. यानंतर न्यायालयाने मंदिराच्या उर्वरित पाडकामाला ३० एप्रिलपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

सहायक आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांच्यावर कारवाई झाली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीकेची तोफ डागण्यात आली होती. विलेपार्ले हा एकेकाळी मराठी संस्कृतीचा अभेद्य गड, तेथील एका जैन देरासरवर महापालिकेची कारवाई होताच काही क्षणांत हजारो जैन बांधव एकवटले व त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून पालिकेच्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करायला भाग पाडले. मुंबईत इतर जातीय व धर्मीय बांधव एकजुटीने राहतात आणि भाजपसारख्या व्यापारी वृत्तीच्या पक्षांना पाठबळ देतात. हे महाराष्ट्राच्या पर्यायाने मराठी माणसांच्या मुळावर येणारे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें