आगामी निवडणूका निष्पक्षपणे व्हाव्यात यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट
राज ठाकरेंचे सवाल; ५ मुद्द्यांवरुन केली आयोगाची कोंडी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्याआधी महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणूका निष्पक्षपणे व्हाव्यात यासाठी मंगळवारी राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, शेकापने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.
निवडणूक याद्यांमधील प्रचंड मोठा घोळ असल्याचा आरोप करत यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगात तक्रारी मांडल्या. तसेच या सर्व तक्रारींचे पत्रही आयोगाला दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकर, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल केले.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. एकाच मतदाराचे दोन दोन ठिकाणी नाव कसे? वडिलांच्या वयापेक्षा मुलांचे वय जास्त कसे? तसेच निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत मग मतदार नोंदणी का थांबवली आहे. जे आज १८ वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का? निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असे परखड सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, असा सवाल उपस्थित करत मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूका घेऊ नका, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विरोधकांचे निवडणूक आयोगाला सवाल:
१) वगळलेल्या मतदारांची नावं किंवा माहिती राजकीय पक्षांना का मिळत नाही?
२) ज्या मतदारांचं नाव वगळलं गेलं त्याची माहिती राजकीय व्यवस्थेला किंवा त्या मतदाराला कळायला नको का?
३) जे मतदार नव्यानं जोडले गेले किंवा वगळले त्यांची नावं संकेतस्थळावर मिळायलाच हवीत
४) ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान जी नावं मतदार यादीत समाविष्ट झाली ती नावं, नवीन मतदारयादी प्रसिद्ध का केली नाही?
५) मतदार यादी हा राजकीय पक्षांचा अधिकार आहे तो लपवण्यात काही छुपा राजकीय हेतू आहेत का? कोणाचा दबाव आहे का?