राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात ठाकरे कुटुंबाने एकी दाखवली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील आज मोठा दिवस मानला जात होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासूनची शुक्रवारी सातवी भेट घडून आली. मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजिक करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. उद्धव ठाकरे आज कुटुंबासह संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले. ठाकरे कुटुंबियांच्या यावेळी भेटीगाठी झाल्या. यानंतर तासाभराने ठाकरे बंधू कुटुंबासह शिवाजी पार्काच्या दिशेला रवाना झाले.
मनसेच्या या दीपोत्सवात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या दीपोत्सवात फार वेगळंच घडलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेला मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांचं आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आलं. यानंतर उद्धव ठाकरे केवळ दोन-तीन वाक्य बोलून मंचावरुन माघारी परतले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिवाळी असल्या कारणास्तव ठाकरे बंधूंनी या कार्यक्रमात राजकीय भाष्य करणं टाळलेलं बघायला मिळालं. तर राज ठाकरे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं नाही.
उपस्थित सर्व बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा! आजची दिवाळी ही वेगळी आहे आणि विशेष आहे. मला खात्री आहे की, मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सर्वजण आनंदात, प्रकाशात राहा. सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद. जय महाराष्ट्र”, असं उद्धव ठाकरे दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळी म्हणाले.
ठाकरे कुटुंबिय एकत्र येत असताना दोन्ही बांधव काय बोलतात? तेच महत्त्वाची नाही तर त्यांची देहबोली कशी होती, याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं. या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबिय चारचाकी गाड्यांमधून शिवाजी पार्कच्या दिशेला निघाले होते. यावेळी ठाकरे बंधू एकाच गाडीत होते. या गाडीचं स्टीअरिंग राज ठाकरे यांच्या हाती होतं. तर दुसऱ्या घाडीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे होते. आदित्य ठाकरे ही गाडी चालवत होते. तर तिसऱ्या गाडीत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे होते. ठाकरे कुटुंबिय या कार्यक्रमात अत्यंत आनंदात एकत्र आलेले बघायला मिळाले.