मातोश्री’च्या बाहेर राज-उद्धव यांचे एकत्र फोटो असलेले बॅनर, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं. आपण महाराष्ट्रासाठी सर्व भांडणं बाजूला सारुन एकत्र येण्यास तयार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्या भाषणात राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामुळे राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू यांनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर झळकले आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेरील बॅनर सध्या चर्चेला कारण ठरत आहे.
उद्धव साहेब आणि राज साहेब महाराष्ट्र आपली वाट पाहतोय. आपण दोघं एकत्र या”, असं आवाहन या बॅनरमधून करण्यात आलं आहे. हा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची ही भावना दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते खरंच एकत्र येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीतील राजकारण पाहता दोन्ही ठाकरे बंधू यांनी एकत्र यावे, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि महाराष्ट्रातील नागरिकांकडून केली जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे दोन मोठे पक्ष फुटले. तसेच शिवसेना फुटीमुळे तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीचंच सरकार निवडून आलं. यानंतर आता आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष यासाठी रणनीती आखत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.