फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या शिक्षणाकडे तसेच रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे.
जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देणार, असा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.