मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरूच !
मिरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षांची मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी; प्रताप सरनाईकांवर सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी निधीचा वापर केला असल्याने, महायुती सरकारची बदनामी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे. यापूर्वी शिवसेनेकडूनही भाजपच्या एका नेत्यावर असाच पत्राद्वारे आरोप करण्यात आला होता. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे. शिवसेनेकडून शहरात अनेकठिकाणी बेकायदा कंटेनर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर भाजपने कारवाईची मागणी केल्याने वादाला सुरुवात झाली आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर अनेक आरोप करत, त्यांची तक्रार पत्राद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी चेना व इतर भागात सरनाईक यांनी खासगी जमीन खरेदी करून स्वतःचा फायदा लक्षात घेऊन सुविधा पुरवण्यासाठी शेकडो कोटींचा सरकारी निधी खर्च केल्याचा आरोप केला आहे.
मेट्रो काम रोखल्याबाबत आमदार मेहतांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याच्या रागातून जैन यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच जैन हे भाजपच्या वरिष्ठ पदावर असल्याने त्यांच्या मागणीनुसार चौकशी व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच जैन यांना बदनामीसंदर्भात नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले.