“तुझ्या मायचा पगार मी केला” वक्तव्यावरून राजकीय वादंग; फडणवीसांची लोणीकरांना समज
पोलीस महानगर नेटवर्क
परतूर (जिल्हा जालना) — भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय खळबळ माजली आहे. एका गावातील भाषणात लोणीकरांनी विरोधकांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोणीकर म्हणाले होते, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार या बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडेही आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायात बूट व चप्पल आमच्यामुळेच आहे. तुझ्या हातातलं डबडं, म्हणजे तो मोबाईल देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”
या वक्तव्यावर अनेक विरोधी पक्षांनी तीव्र निषेध केला असून, सामान्य नागरिकांमधूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत लोणीकरांना समज देण्याची घोषणा केली आहे. फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे प्रधानसेवक म्हणतात. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, मालक नव्हे. लोणीकरांचं वक्तव्य अयोग्य असून, त्यांनी जरी ते कुणाला उद्देशून केलं असलं तरी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही.”