शिवसेना कोणाची? या सुनावणी वर तारीख पे तारीख!
एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट सोक्षमोक्ष लावणार, ऑगस्टमध्ये होणार सर्वात मोठी सुनावणी!
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे २०२५ हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी ऑगस्टमध्ये होऊन निकाल यावा, हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. शिंदे गटाच्याच्या वतीने म्हणणं होतं की, हे दोन वर्ष झोपा काढत होते, त्यांनी काहीच केलं नाही. सुप्रीम कोर्ट म्हणालं, तरी जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावा लागेल कधी ना कधी. ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात देऊ आणि अशी तारीख देऊन ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल. आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर युक्तिवाद होतील त्याच्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल, अशी शक्यता आहे.