“राज ठाकरे यांची खुर्ची हवी होती का?” – अंबरनाथ मनसेत बंडानंतर कार्यकर्त्यांचा संताप
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ – “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व काही दिलं, मग आता काय राज यांची खुर्ची हवी होती का?” असा थेट सवाल अंबरनाथमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत शनिवारी झालेल्या मोठ्या पक्षांतरावर संताप व्यक्त केला. मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेलं हे बंड अंबरनाथच्या राजकारणात नवं वादळ घेऊन आलं आहे. शनिवारी सकाळपर्यंत या हालचालीबाबत शहरात कुजबुज होती, मात्र सायंकाळी अधिकृत पक्षप्रवेश पार पडताच मनसे कार्यकर्ते शहरातील पक्षकार्यालयात जमले आणि संतप्त घोषणा देत बंडखोरांवर सडकून टीका केली.
मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी संताप व्यक्त करताना, “जे गेले ते वॉर्डासाठी नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी गेले आहेत” अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. तर बंडू देशमुख यांनी हल्ला चढवत, “शिवसेनेत गेले ते ठेकेदार, आणि मनसेत राहिले ते खरे शिलेदार. तीन गेले तरी तीनशे यायला तयार आहेत. यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही” असं ठामपणे सांगितलं. देशमुखांनी पुढे आठवण करून दिली की, “यांना शहराध्यक्षपद दिलं, शहर कमिटी त्यांच्या हातात होती, राज ठाकरे, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी थेट संपर्क होता. मग नाराजी कसली? पक्षात राहून स्वतःचाच विकास केला आणि आता पलायन केलं.” पक्ष नेतृत्वाचं मत आहे की, या प्रवेशामुळे शिवसेनेला पालिका निवडणुकीत स्थानिक बळकटी मिळू शकते. मात्र, मनसेत राहिलेले कार्यकर्ते आता अधिक निष्ठावंत आणि लढाऊ असतील. त्यामुळे येत्या निवडणुकीत अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.