सायन कोळीवाड्यात आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा; देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
मुंबई – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात सोमवारी देशभक्तीचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळाला. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या भव्य तिरंगा यात्रेत देशप्रेम, एकात्मता आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. “घराघरात तिरंगा, प्रत्येक हृदयात हिंदुस्थानी” या घोषवाक्यासह तिरंग्याच्या लाटांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ही यात्रा विजय नगर, आंबेडकर नगर आणि म्हाडा चाळ येथून जल्लोषात सुरू झाली. मार्गात एमजीआर चौक, मक्कावाडी जंक्शन, कोळीवाडा जंक्शन, हनुमान मंदिर, सायन रुग्णालय जंक्शन, गांधी मार्केट आणि माटुंगा सर्कल या ठिकाणांवर देशभक्तीच्या घोषणांचा गजर होत राहिला. हजारो नागरिक हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणा देत पुढे सरकत होते.
भाजप मुंबईचे उपाध्यक्ष रवी राजा, मंडळ अध्यक्ष, सर्व वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच परिसरातील हजारो रहिवासी या यात्रेत सहभागी झाले. तिरंग्याची लहर, देशभक्तीची गाणी आणि जोशपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून गेले. प्रवासभर नागरिकांच्या चेहऱ्यावर देशासाठीचे प्रेम आणि अभिमान झळकत होता. ही तिरंगा यात्रा केवळ एक मिरवणूक न ठरता स्थानिक जनतेच्या राष्ट्रप्रेमाचा आणि ऐक्याचा भव्य उत्सव ठरली. स्वतंत्र भारताच्या अमूल्य वारशाची आठवण करून देत, या यात्रेने सर्वांच्या मनात राष्ट्राभिमानाचा नवा जोश निर्माण केला.