• Sun. Oct 19th, 2025

गुहागरात आमदार भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक – नव्या वादाला जाधवांचे ठाम प्रत्युत्तर



गुहागरात आमदार भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक – नव्या वादाला जाधवांचे ठाम प्रत्युत्तर

पोलीस महानगर नेटवर्क

रत्नागिरी – गुहागर तालुक्यातील हे दवतड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नवा संघर्ष उभा राहिला आहे. भाजपा आक्रमक होत असतानाच आता गुहागर येथील ब्राह्मण समाजही जाधव यांच्या विरोधात मैदानात उतरला आहे. डॉ. विनय नातू आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कार्यकर्ता मेळाव्यात टीकेच्या फैरी झाडल्याने वाद पेटला. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण सहाय्यक संघाने आमदार जाधव यांना खुले पत्र पाठवून, “स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्याच्या ऐक्याला बाधा पोहोचवत आहात”, असा आरोप केला. तसेच, त्यांच्या राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजाने दिलेल्या सहकार्याची आठवणही पत्राद्वारे करून दिली.

मात्र, या पत्राला आमदार भास्कर जाधव यांनी ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले की, “गुहागर तालुक्यातील ‘लेखणीचा दहशतवाद’ मी संपवला. माझ्या येण्यापूर्वी विरोधी पक्ष निवडणुकीत हरला की, त्याच्या घरावर दगडफेक व्हायची. हा प्रकार मी थांबवला.” इतिहासाचा अभ्यास मी करतो, पण त्यात रमणारा कार्यकर्ता नसल्याचे सांगत, जाधव म्हणाले, “वर्तमानात जात, धर्म, पंथभेद न करता विकासकामे केली. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती करण्याचा बहुमान मी मिळवून दिला. त्याबद्दल कौतुकाचे पत्र पाठवायला तुम्हाला लाज वाटली असावी. प्रवीण ओक व सौ. पूर्वा ओक यांना दोन वेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन निवडून आणले, गीता खरे यांना नगरपंचायतीतून सभापती केले – हे तुम्ही विसरलात.”

जाधव यांनी पुढे असेही नमूद केले की, “राजकीय सभेत जर मी एखादे राजकीय वाक्य बोललो, तर त्याचा संबंध संपूर्ण समाजाशी जोडणे हे ‘पाताळयंत्री’ लोकांचे काम आहे.” या घडामोडींमुळे गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. एका बाजूला ब्राह्मण समाजाचा आक्रमक पवित्रा तर दुसऱ्या बाजूला आमदार जाधवांचा ठाम प्रतिवाद – यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें