शहीदांच्या वारसदारांना आर्थिक मदत देत उत्तर भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे यंदाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आगळ्या पद्धतीने साजार करण्यात आला. देशाच्या एकतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या ठिकाणी देशभक्ती गीतांनी आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण सभागृह दणाणले. देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्तर भारतीय संघाने आगळ्या पद्धतीने साजरा केला. या ठिकाणी भारतमातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या वारसदारांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात होताच भारत माता की जय च्या गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण सभागृह भारून गेले. व्यासपीठावरून वक्त्यांनी “ऑपरेशन सिंदूर” चा उल्लेख केल्याने उपस्थितांमध्ये अभिमान आणि उत्साहाची लहर पसरली.
या प्रसंगी पाच शहीदांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
१) बांगलादेश युद्धात शहीद लान्स नायक शांताराम मोरे यांच्या पत्नी उज्वला मोरे.
२) पठाणकोट हल्ल्यात शहीद हवालदार सूर्यकांत तेलंगे यांच्या पत्नी मनीषा तेलंगे.
३)कुपवाडा येथे ऑपरेशन रक्षक मोहिमेदरम्यान शहीद कॅप्टन विष्णु गोरे यांची आई अनुराधा गोरे.
४)शहीद अग्निवीर मुरली श्रीराम नाईक यांची आई ज्योतीबाई नाईक.
५)पुलवामा हल्ल्यात शहीद मेजर यशिन रमेश आचार्य यांची आई ग्रेस रमेश आचार्य.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादविरोधी धोरणाचे आणि धाडसी नेतृत्वाचे तसेच भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्याचे मनापासून कौतुक केले. शहीदांच्या शौर्यगाथांचा उल्लेख करून त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समारंभाचे प्रमुख आयोजक आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर.एन.सिंह म्हणाले की, ‘आजच्या तरुण पिढीला हे जाणणे अत्यावश्यक आहे की आपले स्वातंत्र्य हे सहज मिळालेले नाही, तर त्यासाठी अनेकांनी दिलेले बलिदान आणि साहसाच्या किंमतीवर ते मिळालेले आहे.’ शहीदांच्या अमर गाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही सिंह यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास उत्तर भारतीय समाजातील मान्यवर, संघाचे विश्वस्त, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. देशभक्तीचा उत्साह, अभिमान आणि श्रद्धा यांचा विलक्षण संगम येथे अनुभवायला मिळाला. शेवटी सर्वांनी उभे राहून शहीदांना मौन श्रद्धांजली वाहिली. केवळ तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता, शहीद दिन म्हणून अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाच्या एकतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीरसपूतांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.