इंडिया आघाडीचं ठरलं, माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय. आता इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी आणि एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालं आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांनी बी.ए. आणि एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली आहे.२७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केली. १९८८-९० दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले आणि १९९० मध्ये ६ महिन्यांसाठी केंद्र सरकारचे वकील म्हणूनही सेवा दिली. त्यांनी उस्मानिया विद्यापीठासाठी कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील म्हणूनही काम पाहिले.
२ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ५ डिसेंबर २००५ रोजी त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. त्यानंतर १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले.