मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेचा मदतीचा हात : सर्व मंत्री-आमदारांचा एका महिन्याचा वेतन मुख्यमंत्री निधीस
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाला अतिवृष्टी आणि पूराचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांची पिकं, घरं, संसारोपयोगी साहित्य आणि पशुधन वाहून गेल्याने हजारो कुटुंबं उघड्यावर आली आहेत. अशा संकटाच्या काळात शिवसेनेने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घोषणा केली की, शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार आपला एका महिन्याचा वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा करणार आहेत. “नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं ही आपली जबाबदारी आहे. मदत करण्यात कधीच हात आखडता घेतला जाणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याआधी त्यांनी धाराशिव जिल्ह्यात पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील औंसा तालुक्यात प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. “सरकार सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत करेल, कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने देखील आपल्या मंत्र्यांचा, आमदारांचा व खासदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.