• Sat. Jun 6th, 2026

शिवसेनेत मोठी संघटनात्मक घडामोड; आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदी?



शिवसेनेत मोठी संघटनात्मक घडामोड; आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदी?

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात लवकरच मोठा संघटनात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. पक्षाचे आमदार व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या १९ जून रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त हा निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव मांडून मंजुरी दिली जाईल, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.

यापूर्वी २००३ साली उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्या पद्धतीने कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांना ही भूमिका दिली जाईल, असे पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांत संघटनात्मक कामकाज, निवडणुका आणि पक्षविस्तार यामध्ये सक्रिय भूमिका बजावल्यामुळे त्यांना ही बढती देण्याचा विचार पुढे आला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे पक्षात तरुण नेतृत्वाला संधी मिळेल आणि नव्या पिढीच्या माध्यमातून पक्षाला उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्या फळीची उभारणी करण्यावर भर दिला जाईल, असेही संकेत आहेत.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देताना, “तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि संघटनात्मक पातळीवर चांगले काम केले आहे,” असे सांगितले.

आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास पक्षातील त्यांचे महत्त्व आणि अधिकार वाढणार असून, ही प्रक्रिया म्हणजे पक्षाची सूत्रे हळूहळू त्यांच्या नेतृत्वाकडे हस्तांतरित होण्याची सुरुवात मानली जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें