मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; एआय हब, जीसीसी उभारणीमुळे ४५ हजार रोजगार
फडणवीस–नडेला बैठकीत महत्त्वाचे निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करून रोजगारनिर्मितीस मोठा हातभार लावणारं गुंतवणूक पॅकेज मायक्रोसॉफ्ट आणत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मायक्रोसॉफ्ट मुंबईत तब्बल २० लाख चौरस फूटांमध्ये ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ (GCC) उभारण्याच्या तयारीत असून त्यातून ४५ हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनादरम्यान तातडीने मुंबईत दाखल होत फडणवीसांनी ही बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गुंतवणुकीची रूपरेषा स्पष्ट केली. “मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहे. जीसीसी उभारणीसाठी लवकरच सामंजस्य करार केला जाईल. महाराष्ट्राला एआय हब बनवण्याच्या दृष्टीने मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे,” असे फडणवीस म्हणाले.
बैठकीत ‘प्राइम AI OS’ ची सादरीकरणफीत दाखवण्यात आली. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, कृषी आदी अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची शक्यता आणि त्यातून राज्याच्या विकासाला मिळणारा वेग यावर विस्तृत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर (सुमारे १.५७ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सत्या नडेला यांनी केली. कंपनीची ही आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. एआय, क्लाउड सेवा आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांचा विस्तार, तसेच लाखो युवकांना नवीन कौशल्य प्रशिक्षण देण्यावर या निधीचा वापर होणार असल्याचे नडेला यांनी नमूद केले.
“भारताच्या एआय-सक्षम भविष्यासाठी ही गुंतवणूक निर्णायक आहे. मजबूत तंत्रज्ञान पायाभूत सुविधा, कौशल्यविकास आणि सुरक्षित डेटा व्यवस्थापन – या सर्व गोष्टींसाठी ही गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावेल,” असेही नडेला यांनी स्पष्ट केले.
मायक्रोसॉफ्टची ही मोठी घोषणा आणि राज्य सरकारची पुढाकाराची तयारी लक्षात घेता महाराष्ट्र एआय आणि तंत्रज्ञानाच्या नकाशावर आणखी ठळकपणे उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

