देवळ्यात गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई; ४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
देवळा : राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत देवळा शहरात प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३ लाख ४३ हजार २८२ रुपयांचा गुटखा साठा आणि दीड लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ९३ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नाशिक विभागाचे सहआयुक्त शशीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड आणि त्यांच्या पथकाने रविवारी सकाळी देवळा शहरातील निमगल्ली परिसरातील शारदादेवी विद्यालयाजवळ सापळा रचला.
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासणीत टाटा कंपनीच्या ‘छोटा हत्ती’ (एमएच-४१ एजी-११६४) या वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आढळला. कारवाईदरम्यान चालक रामचंद्र निळकंठ जगदाळे यांनी वाहन सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहन ताब्यात घेतले, तर अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी पाठलाग करून जगदाळे यांना पकडले.
यानंतर वाहनासह संपूर्ण गुटखा साठा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, देवळा तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री अद्यापही सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही किराणा दुकाने, टपऱ्या आणि व्यावसायिक आस्थापनांमधून खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः युवकांमध्ये वाढत्या सेवनामुळे आरोग्यविषयक गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही तालुक्यात विविध ठिकाणी गुटखा जप्तीच्या कारवाया झाल्या असल्या तरी अवैध विक्रीचे जाळे अद्याप कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतूकदारांसह साठेबाज, किरकोळ विक्रेते आणि पुरवठा साखळीतील संबंधितांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी सांगितले की, ‘‘गुटखा आणि सुगंधित तंबाखूविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अवैध साठा, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.’’

