भाजपचे नगरसेवक असलेले नवरा बायको यांच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल; ट्रॅक्टर विक्रीचा बनाव रचून ७.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक आशिष पिपरे, त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे आणि वडील अरुण पिपरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर विक्रीचा बनाव रचून ७.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पिपरे यांच्यावर अगरबत्ती प्रकल्पातही गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ४० महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहाव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले आहे.
चामोर्शी येथील रहिवासी वंदना रवींद्र कोठारे (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणुकीचा हा घटनाक्रम २०२१ च्या नगरपंचायत निवडणुकीपासून सुरू झाला. निवडणुकीच्या काळात आशिष पिपरे यांनी कोठारे कुटुंबाकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. पैशांच्या परतफेडीचा तगादा लावल्यानंतर पिपरे यांनी त्यांचा ट्रॅक्टर ७ लाख ५० हजार रुपयांना विकण्याचा प्रस्ताव ठेवला. आधीचे ३ लाख वजा करून कोठारे यांनी उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये रोख व बँक खात्याद्वारे दिले.
मार्च २०२३ मध्ये फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कोठारे यांच्या घरी पोहोचले.तेव्हा या ट्रॅक्टरवर ४ लाख ८० हजारांचे कर्ज थकीत असल्याचे उघड झाले. तसेच तो ट्रॅक्टर पत्नीच्या नव्हे तर वडिलांच्या (अरुण पिपरे) नावावर असल्याचे समोर आलं. पैसे परत मागितले असता पिपरे यांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.केवळ ट्रॅक्टर व्यवहारच नव्हे तर आशिष पिपरे यांच्यावर चामोर्शी परिसरातील जवळपास ४० गरीब शेतकरी व मजूर महिलांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.स्वयंरोजगार योजनेतून प्रत्येकी १ लाख ९० हजारांचे कर्ज मंजूर करून दिले.मात्र,त्यातील मोठा हिस्सा स्वतःकडे वळवून महिलांना निकृष्ट यंत्रसामग्री आणि अत्यल्प रक्कम दिली.
राजकीय दबावामुळे दोन वर्षांपासून तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप करत या महिलांनी २३ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणावर भाष्य करताना आशिष पिपरे यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र,पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे आता पिपरे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

