• Fri. Jul 24th, 2026

‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांची भाजप व बंडखोरांवर टीकेची झोड



‘भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी’; परभणीत उद्धव ठाकरे यांची भाजप व बंडखोरांवर टीकेची झोड

योगेश पांडे / वार्ताहर

परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी परभणीतील जाहीर सभेत भारतीय जनता पक्ष आणि पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली. राम मंदिर, हिंदुत्व, भाजपचे नेतृत्व तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबतही त्यांनी भाष्य करत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला.

परभणीतील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली. “तुम्हाला मंदिर बांधायचे नव्हते, रामाच्या नावाने लूट करायची होती. हिंदूंशी गद्दारी करणारा हा पक्ष आहे. हा भाजप नसून ‘बाबर जनता पार्टी’ आहे,” असा आरोप त्यांनी केला. बाबराने मंदिर लुटले, तर सध्याचे सत्ताधारी मंदिराच्या नावाने जनतेची फसवणूक करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या बंडखोर नेत्यांवरही टीका केली. “गद्दारीची ही कीड आहे. त्यांना निवडून देण्याची माझीही चूक झाली. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर विश्वास ठेवला, पण त्याचा गैरफायदा घेण्यात आला,” असे ठाकरे म्हणाले.

भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मध्य प्रदेशचे उदाहरण दिले. “शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका जिंकल्या. मात्र, नंतर त्यांनाच बाजूला करण्यात आले. भाजपमध्ये जो कोणी पुढे येण्याची शक्यता निर्माण होते, त्याचे पंख वेळेवर छाटले जातात,” असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “काल-परवा विमानप्रवासात ते माझ्यासोबत होते. मात्र, त्यांच्यात आत्मविश्वास दिसत नव्हता. त्यांचे पंख त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील लोकांकडून कापले जात आहेत. न्याय कुणाकडे मागायचा, अशी त्यांची अवस्था झाली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संदर्भातही ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वावर निशाणा साधला. “गडकरी भाजपचे अध्यक्ष होते. ते पुन्हा अध्यक्ष झाले असते तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले असते. त्यामुळे त्यांचेही पंख छाटण्यात आले,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ही सभा बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मतदारसंघात घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करत शिवसैनिकांना एकजूट राखण्याचे आवाहन केले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें