सात वर्षांनंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची पुनरागमन; ३० ऑगस्टला रंगणार ३२ वी स्पर्धा
महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
ठाणे : प्रतिनिधी
ठाणे : ठाणेकरांची उत्सुकता वाढविणाऱ्या ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे. तब्बल सात वर्षांनंतर ही प्रतिष्ठेची स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात येत असून, जास्तीत जास्त खेळाडू आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात आयोजित नियोजन बैठकीत मॅरेथॉनच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, विविध पक्षांचे गटनेते, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंते आणि क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक नियोजन, सुरक्षाव्यवस्था आणि आवश्यक परवानग्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या.
स्पर्धेत शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या ने-आणीसाठी परिवहन बसची व्यवस्था करण्यासह त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदाच्या वर्षा मॅरेथॉनमध्ये केवळ धावपटूच नव्हे तर डॉक्टर, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनाही सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.
स्पर्धेत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यस्तरीय गटात खुला महिला-पुरुष २१ किमी, १८ वर्षांवरील महिला-पुरुष १० किमी आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी १० किमी धाव असे गट असतील. जिल्हास्तरीय गटात १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ५ किमी, १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ३ किमी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०० मीटर धाव आयोजित करण्यात आली आहे.
महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.

